शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

स्वामी निगमानंद


स्वामी निगमानंद

बाबा रामदेव, किंवा अण्णा हजारे यांच्यामधलं साम्य कुठलं आहे हे विचारलं तर पहिली गोष्ट जी मनात येते ती म्हणजे त्यांच्या मागचा मोठा  असलेले फॅन फॉलोअर्सचा जमावडा . त्यांनी काहीही जरी केलं तरी ती बातमी असते.म्हणजे  त्यांनी अगदी शिंक जरी दिली तरी, ” बाबा रामदेव को छिंक आई- किसका है इसके पिछे हाथ? क्या कॉंग्रेस सरकार की ये राजनीती है?  ” म्हणून तशी ब्रेकिंग न्युज पण पहायला मिळू शकेल एखाद्या दिवशी.
अण्णा हजारेंचं पण तसंच असतं की काही बोलले की मिडियाचे प्रवक्ते त्यांच्या मागे पुढे माईक धरून उभे असतात, ते काय बोलतात ते ऐकायला आणि मग त्याची चीर फाड करून लोकांपर्यंत पोहोचवायला.. या गोष्टीसाठी मिडियाला नाही, तर त्या दोघांनाही शंभर मार्क्स! मिडियाला मागे कसे फिरवायचे हे  दोघांनाही चांगलं जमतं.    आता हेच बघा नां, अण्णा हजारेंचं जे ’  किंवा रामदेव बाबांचे ’प्राणांतिक ’ उपोषण जे होतं ते फार तर चार पाच दिवस चालेल असा अंदाज होता माझा. आणि  नेमकं तसंच झालं.
या दोघांच्याही प्राणांतिक उपोषणामधे दोघांनाही काही होणार नाही, कोणीतरी समोर जाऊन लिंबू पाणी देईल आणि उपोषण सोडतील हे दोघंही ह्याची  पण सगळयांनाच कल्पना होती.तरी पण आपण सगळे हा खेळ कसा होतो हे मोठ्या उत्सुकतेने बघत बसलो होतो.
बरेच लोकं आमरण उपोषण करतात, एकदा नाही तर अनेकदा!! :)   आमरण उपोषणाचा हा असा फार्स मी  गेली कित्येक  वर्ष पहातो आहे! सरकारला प्रेशराईज करायला हे प्राणांतिक उपोषणाचे हत्यार वापरले जाते. आज पर्यंत उपोषणा मुळे कोणी मेल्याचे ऐकिवात नव्हते , आत्ता आत्ता पर्यंत तरी – म्हणजे जो पर्यंत स्वामी निगमानंदांचं नांव ऐकलं नव्हतं तो पर्यंत!
गंगा नदीचे पावित्र्य जो पर्यंत तुम्ही  हरिद्वारची ’गंगाजीकी आरती’ पहाणार नाही, तो पर्यंत समजणार  नाही.  गंगा नदीला आपण इतकं पवित्र मानतो की शेवटच्या क्षणी पण दोन चमचे गंगाजल आणि तुळशीचे पान तोंडात घातले, की सदगती लाभते असं आपण पूर्वापार मानत आलो आहोत. गंगेच्या पात्रातले पाणी  स्वच्छ रहावे असे सगळ्यांनाच वाटते. पण आपण काही करू शकत नाही.सध्या ,कधी गंगेवर गेल्यावर त्यातले दोन थेंब पाणी जिभेवर ठेवायची इच्छा  होणार नाही,  इतकं प्रदुषित झाले आहे ते. गंगेचं पावित्र्य का राखलं जाऊ नये?
स्वामी निगमानंद,! दरभंगा जिल्ह्यातला हा एक  स्वामी!  जेंव्हा बाबा रामदेव यांचे उ्पोषण सुरु होते त्याच  काळात ह्यांचे पण  ’आमरण उपोषणावर’ होते! तब्बल ११५ दिवस! ही गोष्ट किती लोकांना माहीत आहे? माझ्या मते अजूनही बऱ्याच लोकांना या   बद्दल काहीच  माहीत नाही.   मिडियाला पण त्याच्या ह्या उपोषणाची दखल घ्यावी असे वाटले नाही.  तो बिचारा १४ वर्ष एकटाच झगडत होता. राजकीय व्यवस्था, पोखरलेली नोकरशाही- सगळे त्याच्या विरोधात असतांना पण त्याचा  लढा सुरु  होता.
बाबा रामदेवांचे स्विस बॅंकेतला पैसा परत आणा म्हणून सुरु केलेले आमरण (!)  उपोषण किंवा लोकपाल विधेयक लागु करा म्हणून अण्णा हजारेंनी केलेल्या प्राणांतिक   (!) उपोषणासमोर ह्या स्वामी निगमानंदांच्या उपोषणाचे कारण ” गंगाजी स्वच्छ ठेवा” हे  कारण फारस ग्लॅमरस वाटत नाही  लोकांना..    इतका महत्त्वाचा मुद्दा,   पण दुर्दैवाने  हा एक हिंदूंचा ’धार्मिक मुद्दा’  झाला असावा, आणि सेक्युलर प्रेस आणि टिव्ही ला  हा मुद्दा  कव्हर करणे म्हणजे हिंदुत्वाला कव्हर करणे असे वाटले असावे.
राजीव गांधी यांनी जेंव्हा गंगा स्वच्छ करावी असे म्हटले होते, तेंव्हा बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.  पण माझ्या मते राजीव गांधींचे त्यावेळेस काहीच चुकले नव्हते. गंगे मधे अर्धवट जाळलेली प्रेतं वाहून जाताना दिसतात बरेचदा. निरनिराळ्या उद्योगांचे सांडपाणी पण प्रक्रिया न करता सोडलं जातं.तसं आपलं पोल्युशन कंट्रोल बोर्ड,  आहे, पण ते कसं काम करतं यावर मी काही टीप्पणी करत नाही.
निगमानंद!! बिहार मधल्या दरभंगा जिल्ह्यात यांचा जन्म झाला. दहावीची परिक्षा १९९५ मधे  ८० टक्के गुण मिळवून उत्तिर्ण झाल्यावर मोठ्या भावाप्रमाणेच आय आय टी मधे जाऊन शिकावे असे वडीलांचे स्वप्न होते. पण एक दिवस मात्र घरी ” मी सत्याच्या शोधात जात आहे ” असे सांगुन घर सोडले आणि मातृसदन या आश्रमात जाऊन राहिले.
उत्तराखंडा मधे नैसर्गीक संपत्ती म्हटले तर फक्त रेती, गिट़्टी  इतकेच आहे. आता इतकी सरकारी संपत्ती म्हटल्यावर बऱ्याच  माइनिंग माफियाच्या आणि   राजकीय नेत्यांच्या तोंडाला पाणी सुटणारच. सरकारचं जे काही आहे, ते आपलंच! ही गोष्ट अगदी पक्की ध्यानात ठेवली आहे राजनेत्यांनी  आणि त्यांच्याशी लागे बांधे असलेल्या लोकांनी. त्यामुळे ही संपत्ती लुटण्यासाठी सगळे सत्ताधारी  आणि विरोधी पक्ष एकत्र झाले आणि या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले गेले.
गंगानदीच्या पात्राच्या शेजारी असलेले दगड खणून बाहेर काढण्यास कायद्याने प्रायव्हेट कंपन्यांना मनाई आहे.इथले दगड काढल्याने , किंवा रेतीचा उपसा केल्याने पात्र खोल होते, आणि वॉटर टेबल खाली जातो- आणि जवळपासच्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष होतं. माइनिंग करण्याची परवानगी फक्त सरकारला आहे. कायद्याने जास्तित जास्त सहा फुटा पर्यंत एक्स्कॅव्हेशन केले जाऊ शकते. असे असतांना सुद्धा इथे  लोडर्स, एक्स्कॅव्हेटर्स सारख्या मोठमोठ्या मशिन्स वापरून इथे नदीकिनारी इल्लिगल माइनिंग करुन दगड काढले जातात. नुकताच एका क्रशरवर छापा घातला असता  ४५ हजार टन अवैध रित्या काढलेले दगड सापडले.
ह्या दगडाला  क्रशर मधे घालून क्रश करणे आणि गिट़्टी वगैरे मार्केटला विकणे हा एक खूप मोठा व्यवसाय आहे . दगड क्रशर मधे बारिक केल्यावर उडणारा धुराळा हा शेजारच्या शेतीच्या जमीनिवर जाऊन बसतो आणि जमीन नापिक होते. जवळपास रहाणाऱ्या लोकांना छातीचे विकार, श्वासाचे विकार, टिबी वगैरे होणे तर नेहेमीचेच झालेले आहे. हा धुराळा एकदा जमिनिवर बसला की जमिन नापिक होते, आणि मग हीच जमीन क्रशर माफियाला कवडीमोलाने विकणे इथल्या लोकांना भाग पडते.
दगड काढतांना होणारे गंगेचे प्रदुषण हा पण  महत्वाचा मुद्दा आहेच. या लढ्याला केवळ धार्मिक  लढा  किंवा भावनीक मुद्दा म्हणून पहाणे बरोबर होणार नाही. हा एक सामाजिक लढा आहे, करोडो रुपयांच्या राष्ट्रीय खनिज संपत्तीचा केल्या जाणाऱ्या गैर वापरा विरुद्ध.
साधारण पणे १९९८ साली हा संघर्ष सुरु झाला.  महाकुंभ मेळा असलेल्या भागात नदी मधे दगड , रेती काढण्यावर बंदी घातलेली असतांना पण त्या ठिकाणी हरीद्वारला मोठ्या प्रमाणात मायनिंग सुरु होते. याविरोधात स्वामी निगमानंदांनी सर्वप्रथम आवाज उठवला  आणि कोर्टातून स्टे आणला. इथूनच खरी त्यांच्या  गंगा शुद्धीकरण लढ्याची सुरुवात झाली.
कोर्ट कचेऱ्या आणि बरंच काही झालं या चौदा वर्षात. कित्येकदा उपोषणं केली गेली, मोर्चे काढल्या गेले, पण म्हणावे तसे ह्या लढ्याला वृत्तपत्रीय, टिव्ही वर प्रसिद्धी वगैरे मिळू शकली नाही, आणि यश पण मिळाले नाही. त्या भागात असलेल्या हजारो अधिकृत आणि अनधिकृत क्रशर कंपन्या, आणि त्यांचे सरकारी नेत्यांशी असलेले लागे बांधे, या मुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास ज्युडीशिअरीवर दबाव आणणे अवघड जात  होते.एका क्रशरवर सापडलेला ४५ हजार टन माल योग्य पावती नसल्याने जप्त केला जातो, नंतर तोच माल कुठली तरी पावती दाखऊन वर्षा-सहा महिन्यानंतर सोडवून घेतला जातो.असे प्रसंगही त्यांच्या समोर आले, पण त्यांनी लढा सुरु ठेवला.
मागे फॉलोअर्स फारसे नाहीत, काही न्युसेन्स व्हॅल्यु पण नाही, त्यामुळे सरकारला त्यांच्याकडे  लक्ष द्यायची गरज वाटत नव्हती. सरकारचं लक्ष वेधून घ्यायचा एकच मार्ग दिसत होतो- तो म्हणजे प्राणांतिक उपोषण! पण ते करूनही त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.
ज्या   हिमालयन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल  मधे बाबा रामदेव यांना ऍडमिट केले होते, आणि चोविस तास मिडिया त्यांचे उपोषण कव्हर करत होता, त्याच दवाखान्यात स्वामी निगमानंदांना पण भरती केले होते. बाबा रामदेव यांनी जुस घेऊन उपवास सोडला, आणि टिव्ही वर ब्रेकिंग न्युज झळकत होती,  तेंव्हा स्वामी निगमानंद त्याच दवाखान्यात मृत्युशी लढा देत  होते,पण कुठल्याच  न्युज चॅनललवर किंवा वृत्तपत्रात  याबद्दल काही बातमी आली नव्हती. स्वामीजींनी उपवास सोडावा म्हणून एकाही नेत्याने प्रयत्न केले नाहीत, कींवा त्यांना भेटायलाही कोणी गेले नाही.   त्याची दखल ना तर मिडीया घेतली , ना नोकर शाही, ना सरकार ने!.
ह्या एकांड्या शिलेदाराच्या मृत्युनंतर पण फक्त एक लहानशी चौकट दिसली पेपरमधे, “गंगा शुद्धीकरण अभियानाचे पुरस्कर्ते, स्वामी निगमानंद यांचा उपोषणामुळे मृत्यु झाला आहे  इतकंच!! बस्स
हा लेख इथेच संपवतो, तुम्हाला विचार करायला एक मुद्दा देऊन, मिडीयाचे हे असे वागणे का असावे?? का म्हणून स्वामी निगमानंदाकडे दुर्लक्ष केले गेले असावे? हा करोडो रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा आणि गंगा प्रदुषण हा मुद्दा खरंच इतका दुर्लक्ष करण्यासारखा आहे का?
” मिडिया कॅन  कॅन मेक ऑर ब्रेक “  हेच खरं!


--
Protect our environment, keep it safe; tomorrow, we’ll be saved!
Reduce, reuse, recycle!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: